परभणी - बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास
परभणी, 10 जून, (हिं.स.) बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना सेलू बसस्थानकात बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. नाशिक येथे वास्तव
परभणी - बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लंपास


परभणी, 10 जून, (हिं.स.) बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना सेलू बसस्थानकात बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

नाशिक येथे वास्तव्यास असलेले दाम्पत्य कमल पंडीतराव डंबाळे (वय 70, रा. धनेगाव) व त्यांचे पती सेलू बसस्थानकात आले होते. ते आपल्या मुलीकडे जाण्यासाठी सेलू-पाथरी (बस क्र. एमएच-20-8792) या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. घटनेची माहिती तत्काळ आपत्कालीन क्रमांक 112 वर देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरात धाव घेतली. संबंधित महिला व त्यांचे पती पुढील तक्रार नोंदविण्यासाठी सेलू पोलीस ठाण्यात दाखल झाले.

दरम्यान, या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोरी, पाकिटमारी तसेच महिला व तरुणींना छेडछाड करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून बसस्थानक परिसरात पोलिसांकडून अधिक कडक बंदोबस्त व गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande