
कोल्हापूर, 10 जून (हिं.स.)। गुजरात, अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहित दीपकराव चव्हाण याची आज दसरा चौक येथून उघड्या जीपमध्ये भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू असलेल्या रोहित चव्हाण याने भारताकडून प्रतिनिधित्व करत रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याच्या या शुभ्रधवल यशानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कावळा नाका येथे त्याचे प्राथमिक स्वरूपात स्वागत करण्यात आले .
तर दसरा चौक येथून उघड्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . ही मिरवणूक दसरा चौक, अयोध्या टॉकीज ,महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर ते अर्ध शिवाजी पुतळा त्याचबरोबर उभा मारुती चौक मार्गे सरदार तालीम येथे विसर्जित करण्यात आली. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल परिचितांकडून पुष्पगुच्छ तसेच कोल्हापूरी फेटा बांधून अभिनंदन करण्यात आले . याप्रसंगी श्री चव्हाण यांचे कुटुंबीय,आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar