
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) । गतविजेत्या अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक २०२६ च्या आधीच्या आपल्या अंतिम सराव सामन्यात आइसलँडला ३-० ने पराभूत केले. या विजयाचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्णधार लिओनेल मेस्सीचे पुनरागमन, ज्याने दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतल्यावर आपला प्रभाव पाडला.
दुसऱ्या हाफमध्ये मेस्सीला मैदानात उतरवण्यात आले आणि त्याने लगेचच सामन्याचे चित्र पालटून टाकले. मैदानात आल्यानंतर काही क्षणांतच, त्याच्या अचूक पासमुळे लॉटारो मार्टिनेझसाठी एक संधी निर्माण झाली. बॉक्समध्ये मार्टिनेझवर फाऊल झाला आणि अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. पेनल्टी घेण्यासाठी पुढे आलेल्या मेस्सीने आत्मविश्वासाने चेंडू जाळ्यात टाकला. त्याच्या या गोलची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली, अनेक चाहत्यांनी याला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात नेत्रदीपक पेनल्टींपैकी एक म्हटले. मेस्सीची कामगिरी अर्जेंटिनासाठी दिलासादायक आहे. दुखापतीमुळे तो मागील सामना खेळू शकला नव्हता, पण या सामन्यात त्याने सिद्ध केले की तो विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि सज्ज आहे. लवकरच ३९ वर्षांचा होणारा मेस्सी आपल्या कारकिर्दीतील सहाव्या फिफा विश्वचषकात खेळत आहे. त्याने आतापर्यंत अर्जेंटिनासाठी ११७ आंतरराष्ट्रीय गोल केले असून तो संघाचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे.
सामन्यादरम्यान अर्जेंटिनाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. संघाचा युवा प्रतिभावंत व्हॅलेंटाइन बारकोने आठव्या मिनिटालाच गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्यादरम्यान अर्जेंटिनाचा संघ आइसलँडविरुद्ध नेहमीच एक पाऊल पुढे दिसायचा.
शेवटच्या उरलेल्या मिनिटांत अर्जेंटिनाच्या संघाने अनेक उत्कृष्ट संधी निर्माण केल्या. पण 87 व्या मिनिटाला संघाला यश मिळाले. जेव्हा थियागो अल्माडाने अप्रतिम चाल करून गोल केला. त्यामुळे संघाला एकूण ३-० अशा फरकाने विजय मिळवता आला. अर्जेंटिना आता १६ जून रोजी कॅन्सस सिटीमध्ये अल्जेरियाविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे