
इस्लामाबाद, 10 जून (हिं.स.)भारताच्या पाठोपाठ, पाकिस्ताननेही आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई खेळांसाठी आपला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानने टी-२० फॉरमॅटसाठीही एक मजबूत संघ निवडला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात आणखी एक हाय-व्होल्टेज सामना होण्याची आशा निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने साहिबजादा फरहानची कर्णधारपदी आणि अब्दुल समदची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
पाकिस्तानने अष्टपैलू सलमान अली आगाच्या जागी सलामीवीर साहिबजादा फरहानची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आगाला संघातून वगळण्यात आले आहे. पाकिस्तान भारताचे अनुकरण करत असल्याचे दिसते. ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून काढून नवीन कर्णधाराची नियुक्ती करण्यात आली होती, त्याचप्रमाणे पाकिस्तानही त्याच पद्धतीचे अनुकरण करत आहे. यापूर्वी, सलमानच्या कार्यकाळात पाकिस्तानने उपकर्णधाराची नियुक्ती केली नव्हती. भारताने तिलक वर्मा या नवीन क्रिकेटपटूची उपकर्णधार म्हणून निवड केली, त्याचप्रमाणे पीसीबीनेही अब्दुल समदची नियुक्ती केली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात फरहान पाकिस्तानचा सर्वात यशस्वी फलंदाज होता. गेल्या काही महिन्यांत प्रभावी कामगिरी करणारा यष्टीरक्षक उस्मान खान याचाही संघात समावेश आहे. मात्र, पाकिस्तानने आपल्या अनेक अव्वल क्रिकेटपटूंना या संघातून वगळले आहे. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या क्रिकेटपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून वगळण्यात आले आहे.
साहिबजादा फरहान यापूर्वी भारताविरोधातील आपल्या वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने बंदुकीच्या धाकाने केलेल्या सेलिब्रेशनमुळे वाद निर्माण झाला होता. त्याने २०२५ च्या आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध मारलेल्या षटकारांवर आधारित एक माहितीपटही बनवला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.
गेल्या काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले आहे. २०२५ च्या आशिया कपमध्ये दोन्ही संघ तीन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आणि भारताने तिन्ही सामने जिंकले. त्यावेळी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत होता आणि भारताने विजेतेपदही पटकावले. त्यानंतर, कोलंबो येथे झालेल्या २०२६ च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानलाही पराभव पत्करावा लागला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे