
- इमेलमध्ये खलिस्तान नॅशनल आर्मीचा उल्लेख
मुंबई, 10 जून (हिं.स.) - मुंबई महापौर, पुणे महापालिका कार्यालय, विधान भवन आणि नागपूरातील संघ मुख्यालय बाॅम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी मिळाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके त्वरित सक्रिय झाली. 'तामिया एडवर्ड्स' (Tamia Edwards) या नावाने पाठवलेल्या या ईमेलमध्ये कथित आयईडी स्फोटांच्या वेळाही नमूद करण्यात आल्या होत्या. मुंबईच्या महापौरांनाही त्यांच्या कार्यालयाला आणि अधिकृत वाहनाला लक्ष्य करणारा धमकीचा ईमेल प्राप्त झाला. दोन्ही शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, सायबर आणि तपास यंत्रणा ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे आणि यात गुंतलेल्या संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्याचे काम करत आहेत. खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने धमकीचे ईमेल दिल्याची माहिती समोर आली. दरम्यान अहमदाबाद, गांधीनगरमध्येही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पुणे महानगरपालिका कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. परिणामी, खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करण्यात आली आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. सकाळी ८ च्या सुमारास 'तामिया एडवर्ड्स'ने पाठवलेल्या या ईमेलमध्ये पुणे महापौरांचे कार्यालय, नागपुरातील आरएसएस मुख्यालय आणि विधान भवन यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये 'बॉम्ब स्फोट/आयईडी'चा उल्लेख होता आणि कथित स्फोटांच्या वेळाही दिल्या होत्या. पुणे महापौरांच्या कार्यालयासाठी दुपारी १:११, विधान भवनासाठी दुपारी ३:११ आणि संघ मुख्यालयासाठी सायंकाळी ६:११. या धमकीच्या संदेशात 'खलिस्तान', 'ऑपरेशन ब्लू स्टार', 'खलिस्तान नॅशनल आर्मी' यांचा संदर्भ देण्यात आला होता आणि त्यात संघ/भाजप विरोधी विधानेही होती. बदला, बदला, बदला अशी भाषा वापरून, ईमेलमध्ये लोकांना आपली मुले वाचवण्याचा इशारा देण्यात आला होता.
धमकीची बातमी मिळताच पुणे पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आणि कसून तपासणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, परंतु ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी आणि ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतही महापौरांना लक्ष्य करणारा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलमध्ये महापौरांचे अधिकृत वाहन आणि कार्यालयीन कक्ष बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा या दोन घटनांमधील संभाव्य संबंधांचाही तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी