
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली असून देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासालाही त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
शिंदे म्हणाले की, इतिहासात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ४३९८ दिवसांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांनी केवळ विक्रमच केला नाही, तर भारताचा डंका जगभरात वाजवण्याचे काम केले आहे. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणली असून ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटत आहे.
मोदी यांनी विकसित भारत २०४७ ही संकल्पना मांडून पुढील २१ वर्षांचा रोडमॅप देशासमोर ठेवला आहे.
त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली असून ३३ देशांचे सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासातही मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला दोन लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर मोदी सरकारने बारा वर्षांत दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ऐतिहासिक काम मोदी सरकारने केले. मराठी भाषेचा देशभर प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठीही प्रयत्न करण्यात आले. ‘विकास ते विरासत’ या संकल्पनेतून विकासाबरोबरच सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात आले. यूपीए सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या तुलनेत दुप्पट इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले असून विमानतळांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे.
जनधन योजनेच्या माध्यमातून ५० कोटी बँक खाती उघडण्यात आली. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. ३२ कोटी नागरिकांना गरिबीरेषेच्या वर आणण्यात यश मिळाले असून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात आहे. वाराणसी कॉरिडॉर, सोमनाथ मंदिर यांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक वारशांचे संवर्धन करण्यात आले. महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीत नोंद होण्यातही मोदी सरकारचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी, महिला, गरीब आणि युवकांसाठी विविध योजना राबवून सर्वच क्षेत्रांत काम केल्यामुळे मोदी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि कलम ३७० हटविणे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ती दोन्ही स्वप्ने मोदी यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही शिंदे म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम मोदी सरकारने केले. भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पूर्वीच्या सरकारांनी मवाळ धोरण स्वीकारले होते; मात्र आता भारत घरात घुसून उत्तर देण्याची क्षमता ठेवतो. हे मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफविरोधातही मोदी यांनी ठाम भूमिका घेत शेतकरी आणि देशहिताला प्राधान्य दिले. मोदींसाठी ‘नेशन फर्स्ट’ आहे, तर विरोधकांसाठी ‘करप्शन फर्स्ट’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
मोदी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याचाही उल्लेख शिंदे यांनी केला. माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांनी आपुलकीने चौकशी केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान माझा आवाज बसला असताना उपचार करण्याचा सल्लाही दिला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर परदेश दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळात खासदार श्रीकांत शिंदे सहभागी होते. त्यावेळीही मोदी यांनी त्यांची आणि कुटुंबाची आस्थेने विचारपूस केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मोदी सातत्याने काम करत असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता गरिबांच्या कल्याणासाठी ते कार्यरत असतात. त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यांचे कष्ट, मेहनत, डेडिकेशन आणि डिव्होशन प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे शिंदे म्हणाले.
शिवसेना आणि एनडीएच्या संबंधांबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका सोडली, त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर ठाम राहून पुन्हा एनडीएसोबत आलो. असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोल लगावला. शिवसेना आणि एनडीएचे नाते जुने असून काहींच्या स्वार्थामुळे ते तात्पुरते दूर गेले होते. महाराष्ट्रात पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर