
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)आयसीसीने पुरुषांच्या कसोटी क्रमवारीतील नवीनतम अपडेट जाहीर केले असून, फलंदाजांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा उपकर्णधार हॅरी ब्रुकने आपला सहकारी जो रूटला मागे टाकत पुन्हा एकदा जगातील अव्वल कसोटी फलंदाजाचा मान मिळवला आहे. यापूर्वी ब्रुकने डिसेंबर २०२४ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या २०२५-२७ विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्याने क्रमवारीत उलथापालथ घडवली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कमी धावसंख्येचा ठरला, जो इंग्लंडने ११५ धावांनी जिंकला.
हॅरी ब्रुकने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले, ज्यामुळे त्याला क्रमवारीत वर येण्यास मदत झाली. दुसरीकडे, हा कसोटी सामना माजी कर्णधार जो रूटसाठी एक दुःस्वप्न ठरला. रूट दोन्ही डावांमध्ये केवळ ९ धावा करू शकला होता. पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ८ धावा. या खराब कामगिरीनंतर, तो आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारीत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
रुटच्या खराब कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला झाला आहे. हेड आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचा अर्थ, पहिल्या तीनमध्ये आता ब्रूक पहिल्या, हेड दुसऱ्या आणि रूट तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी १७ जूनपासून ओव्हलवर खेळवली जाईल. रूटला पुनरागमन करण्याची संधी मिळेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत कर्णधार शुभमन गिल शानदार कामगिरी केली. त्याने एक शतकही झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या शतकामुळे गिलला आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेण्यास मदत झाली असून, तो आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवने गोलंदाजांच्या क्रमवारीत एक स्थानाची झेप घेत १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरनेही लक्षणीय झेप घेतली असून, अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत दोन स्थानांनी पुढे जात तो नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा बेन डकेट तीन स्थानांनी वर चढून १५ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर यष्टीरक्षक जेमी स्मिथ पाच स्थानांनी झेप घेऊन २३ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्सदेखील १५ स्थानांनी पुढे जात ४० व्या स्थानावर पोहोचला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे