नेहरू आणि मोदी यांची तुलना अशक्य; नेहरूंचे योगदान विसरता येणार नाही – शरद पवार
मुंबई, 10 जून (हिं.स.)। मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच
sharad pawar statement comparing nehru mod NCP 27th anniversary


sharad pawar statement comparing nehru mod NCP 27th anniversary


मुंबई, 10 जून (हिं.स.)। मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होत असलेल्या तुलनेवर स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली. नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली जाऊ शकते, मात्र नेहरूंचे कर्तृत्व, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या जाहिरातींचाही उल्लेख केला. विविध वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर पक्षाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या पानावरील जाहिरातींसाठी मोठा खर्च करावा लागतो, त्यामुळे आपण कधीही त्या मार्गाने गेलो नव्हतो, असे ते म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि पक्षाबद्दलचा उत्साह पाहता ही जाहिरात सर्वांसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी पक्षाच्या राजकीय वाटचालीचाही आढावा घेतला. सत्ता असो वा नसो, त्याची चिंता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधी केली नाही. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात राहून लोकांसाठी काम करण्यात घालवला आहे. सत्ता असेल तर सत्तेत राहून आणि सत्ता नसेल तर जनतेमध्ये राहून काम करण्याची पक्षाची परंपरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक अशा विविध घटकांच्या समस्यांनी देशाला ग्रासले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांवर किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे, असा टोला त्यांनी लगावला. काही लोक सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की, या देशात असा एखादा पूर्वी नेता झालाच नाही, असेही शरद पवार म्हणाले. त्याचवेळी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आदर व्यक्त केला. धोरणांवर टीका होऊ शकते, परंतु पंतप्रधानपद या संस्थात्मक पदाचा अनादर करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.

नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळाच्या तुलनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, एखादा नेता किती काळ पंतप्रधान राहिला याची तुलना होऊ शकते. मोदी यांना दीर्घकाळ देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र नेहरूंच्या योगदानाशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरूंनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला, अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आणि राष्ट्राच्या पायाभरणीत त्यांचे योगदान मोठे असून तो इतिहास विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले.

शरद पवार गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला, असे एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यांनी लक्षात घ्यावं की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केले. पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. असे सांगून महाजन यांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या परदेश दौऱ्यातील एका प्रसंगाचा उल्लेख करत त्यांच्या स्वाभिमानी भूमिकेचं उदाहरण दिलं. “एका परदेश दौऱ्यात अपेक्षित प्रोटोकॉलनुसार त्यांचं स्वागत झालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी संबंधित देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटण्यासाठी घाई न करता भारताच्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला. त्या तेथे व्यक्ती म्हणून नव्हे, तर देशातील कोट्यवधी जनतेच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या. देशाचा सन्मान सर्वात महत्त्वाचा असल्याची त्यांची भूमिका होती,” असं पवार यांनी सांगितलं.

पुढे शरद पवार म्हणाले की, सामान्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी तत्पर राहील. आगामी काळातील संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. पुढील ८ ते १० दिवसांमध्ये आपण सर्व प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत. देशातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती निश्चिती करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाईल, असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande