पश्चिम बंगालमध्ये खातेवाटप, 35 मंत्र्यांना मिळाली नवी जबाबदारी
कोलकाता, 10 जून (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने मंत्रिमंडळातील 35 नव्या मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप केले आहे. गेल्या 1 जून रोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल दहा दि
पश्चिम बंगाल विधानभवन लोगो


कोलकाता, 10 जून (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने मंत्रिमंडळातील 35 नव्या मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप केले आहे. गेल्या 1 जून रोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल दहा दिवसांनी राज्य सरकारने खाते वाटपाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी गृह, पर्वतीय व्यवहार, माहिती व संस्कृती, वीज, जमीन व भूमी महसूल, कार्मिक तसेच प्रशासकीय सुधारणा यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. खातेवाटप पूर्ण झाल्यानंतर आता सरकार विविध क्षेत्रांतील विकास योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर भर देणार आहे.भाजपचे वरिष्ठ नेते स्वपन दासगुप्ता यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले वरिष्ठ आमदार तापस राय यांना उद्योग व वाणिज्य खात्याचा कारभार देण्यात आला आहे.आरोग्य क्षेत्रात वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि विधाननगर मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले आमदार डॉ. शारद्वत मुखर्जी यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोआपाडा मतदारसंघाचे आमदार अर्जुन सिंह यांना परिवहन आणि कामगार खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाची पुन्हा 2 भागांत विभागणी करण्यात आली आहे. जगन्नाथ चटर्जी यांच्याकडे उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली असून दीपक बर्मन यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय दीपक बर्मन यांना गृहनिर्माण आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) विभागाची अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.दूध कुमार मंडल यांना कृषी खाते देण्यात आले आहे. शंकर घोष यांच्याकडे पर्यटन आणि संसदीय कार्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला असून मनोज उरांव यांना वन व पर्यावरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.डॉ. अजय कुमार पोद्दार यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पीएचई) आणि सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभाग सोपविण्यात आले आहेत. गौरीशंकर घोष यांना मागासवर्गीय कल्याण, जनशिक्षण विस्तार आणि ग्रंथालय सेवा विभाग देण्यात आला आहे, तर अरुप कुमार दास यांच्याकडे सिंचन व जलसंपदा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. इंद्रनील खान यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभागाचा कार्यभार आता मालती रावा राय यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे स्वयं-सहायता गट, स्वयंरोजगार आणि कार्यक्रम निरीक्षण विभागांचीदेखील अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, 4 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 294 पैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 9 मे रोजी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासह पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर 1 जून रोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 35 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. आता खातेवाटप पूर्ण झाल्याने राज्यातील प्रशासनिक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande