
परभणी, 13 जून (हिं.स.) : मानवत रोड रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एका व्यक्तीने धावत्या मराठवाडा एक्स्प्रेससमोर उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृत व्यक्तीचे नाव नाथा कोंडीबा सत्वधर (वय 50, रा. झरी, ता. पाथरी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा एक्स्प्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकातून जात असताना नाथा सत्वधर यांनी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 1 समोरील रेल्वे रुळांवर उडी घेतली. ही घटना लक्षात येताच लोको पायलटने प्रसंगावधान राखत तातडीने आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र, गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच संबंधित व्यक्ती रेल्वेखाली आली.
या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. संबंधित यंत्रणेकडून घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis