रत्नागिरी : संगमेश्वरमध्ये ऑनलाइन दरोडेखोरांकडून १५ दिवसांत ४ लाख ३९ हजारांची लूट
रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । संगमेश्वर शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक दरोडेखोरांनी उच्छाद मांडला असून ऑनलाइन दरोडेखोरांकडून १५ दिवसांत ४ लाख ३९ हजारांची लूट करण्यात आली. संगमेश्वरमधील नावडी येथील एका सुशिक्षित इंजिनिअर तरुणाला सायबर भामट्यांनी २ ला
रत्नागिरी : संगमेश्वरमध्ये ऑनलाइन दरोडेखोरांकडून १५ दिवसांत ४ लाख ३९ हजारांची लूट


रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । संगमेश्वर शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक दरोडेखोरांनी उच्छाद मांडला असून ऑनलाइन दरोडेखोरांकडून १५ दिवसांत ४ लाख ३९ हजारांची लूट करण्यात आली.

संगमेश्वरमधील नावडी येथील एका सुशिक्षित इंजिनिअर तरुणाला सायबर भामट्यांनी २ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. नावडी येथील ३५ वर्षीय शशांक प्रकाश सावंत या सुशिक्षित तरुणाने या लुटीप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणुकीची घटना ३० मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत घडली. अज्ञात सायबर दरोडेखोरांनी शशांक सावंत यांच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांना लक्ष्य करत यंत्रणेला आव्हान दिले आहे. यामध्ये त्यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा संगमेश्वर येथील खात्यामधून अनुक्रमे ९५,००० रुपये आणि ८०,००० रुपये, तसेच 'जनता सहकारी बँकेच्या संगमेश्वर शाखेतील खात्यामधून ५०,००० रुपये, अशी एकूण २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने लंपास करण्यात आली.

पंधरा दिवसांपूर्वीच संगमेश्वर बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी तौफिक जिकर मेमन व त्यांच्या पत्नीच्या बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेतील खात्यावर सायबर चोरांनी असाच धाडसी दरोडा टाकला होता. मेमन यांच्या खात्यातून तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपये ऑनलाइन चोरून नेले. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, आता पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला अशाच पद्धतीने लुबाडण्यात आले आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरातील खातेदारांमध्ये सायबर सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शशांक सावंत यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचे वाढते गांभीर्य आणि जनतेमधील अस्वस्थता लक्षात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande