
रायगड, 13 जून (हिं.स.) : रोहा बाजारपेठेतील एका कृषी सेवा केंद्रामार्फत शासनाच्या अनुदानित खताचा अनधिकृत वापर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे रोहा बाजारपेठ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला सुमारे 3 लाख 54 हजार 513 रुपयांचा अनुदानित युरिया व सुफला खतसाठा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला नाही.
आरोपीने शासनाची दिशाभूल करून हा खतसाठा कृषी उपयोगाऐवजी औद्योगिक प्रक्रियेसाठी किंवा अन्य अनधिकृत कारणांसाठी वळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित खत मिळाले नसल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 318(2), खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदी तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप फड करीत असून, खतसाठ्याची नेमकी विल्हेवाट कोठे लावण्यात आली आणि या गैरव्यवहारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. कृषी अनुदान योजनांमधील गैरप्रकारांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)