
नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि फ्रान्स हे जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यरत असलेले विश्वासू भागीदार आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या संदर्भात, त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या भारत-फ्रान्स उपक्रमांवर, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारत प्रशांत क्षेत्रात स्थिरता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्तपणे केलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष साजरे होत असताना सुरू असलेल्या या उत्सवावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की, जागतिक हितासाठी काम करण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक संकल्पातील 'भारत इनोव्हेट्स' हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रदर्शित केलेल्या डीप-टेक सोल्युशन्समध्ये प्रतिबिंबित झालेल्या भारतातील स्टार्टअप क्रांतीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी ग्रामीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपग्रह तंत्रज्ञान, शाश्वत जीवनासाठी प्रगत उत्पादन (ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग) आणि स्वच्छ विकासासाठी हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान व इलेक्ट्रिक मोबिलिटी यांच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर दिला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, डिजिटल युगात सुरू असलेली तांत्रिक क्रांती मानवजातीसाठी नव्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन देते. या पार्श्वभूमीवर त्यांनी `भारत इनोव्हेट्स`मध्ये उपस्थित असलेल्या नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि मानवकेंद्रित तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले. त्यांनी यावर भर दिला की, नवउद्योजक उपक्रमांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या बाजारमूल्याच्या आधारे न करता, मानवजातीवर होणाऱ्या त्यांच्या परिणामाच्या आधारेही तितक्याच प्रमाणात केले पाहिजे. `भारत इनोव्हेट्स` चा हाच मुख्य संदेश असल्याचे नमूद करत त्यांनी उपस्थितांना जागतिक नवोन्मेषाच्या पुढील पर्वाची सहनिर्मिती करण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी क्वांटम संगणन, अर्धसंवाहक, जैवतंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, आरोग्यसेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, स्वच्छ ऊर्जा आणि इतर अत्याधुनिक क्षेत्रांतील नवउद्योजक उपक्रमांचे प्रतिनिधी आणि नवोन्मेषक यांच्याशी संवाद साधला. उपस्थित नेत्यांनी प्रदर्शनालाही भेट दिली आणि क्वांटम संगणन, अर्धसंवाहक, जैवतंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, आरोग्यसेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, स्वच्छ ऊर्जा आणि इतर अत्याधुनिक क्षेत्रांतील नवउद्योजक उपक्रमांचे प्रतिनिधी आणि नवोन्मेषक यांच्याशी संवाद साधला.
`भारत इनोव्हेट्स` हा कार्यक्रम विकसित भारताच्या संकल्पनेनुसार भारताला जागतिक नवोन्मेष केंद्रात रूपांतरित करण्याच्या भारत सरकारच्या दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करतो. तसेच जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देण्यासाठी भारत-फ्रान्स सहकार्याचे महत्त्वही तो ठळकपणे दर्शवितो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी