गुजरात : लक्झरी बस आणि ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 31 जखमी
वडोदरा, 17 जून (हिं.स.) : गुजरातमध्ये वडोदरा-जरोद रस्त्यावर कोटंबी गावाजवळ बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात लक्झरी बस आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना
गुजरातच्या वडोदरा येथील अपघाताचे छायाचित्र


वडोदरा, 17 जून (हिं.स.) : गुजरातमध्ये वडोदरा-जरोद रस्त्यावर कोटंबी गावाजवळ बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात लक्झरी बस आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी वडोदऱ्यातील सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एक लक्झरी बस महामार्गावरून प्रवास करत असताना हा अपघात झाला. यावेळी बसने वेगात पुढे जात असलेल्या ट्रकच्या मागील भागाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि त्यामधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. परिसरातील स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदत व बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या 31 प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) टीमही घटनास्थळी पाचारण करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली. अपघाताची माहिती मिळताच जरोद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम सुरू आहे.सध्या पोलिस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार अतिवेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे ही दुर्घटनेची कारणे असू शकतात. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande