
नागपूर, 17 जून (हिं.स.) - ‘ऑपरेशन टायगरशी भाजपाचा काहीही संबंध नाही’, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, याबाबत कोणाचीही ना नाही. ज्यांनी-त्यांनी आप-आपल्या पक्षाचा निर्णय घ्यायचे असतात. आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे लोक का सोडून चालले? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. मात्र, या विषयाशी तथा ऑपरेशन टायगरशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदारांचा स्वतंत्र गट तयार झाला असून लवकरच तो शिंदे गटात सामील होणार आहे. या चर्चांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र, भारतीय जनता पक्षाचा या ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. त्यामुळे या ‘ऑपरेशन टायगर’शी आमच्या नेत्यांना काही बोलणे योग्य नाही. ज्या विषयाशी संबंधित आम्हाला काहीही माहिती नाही, त्यामुळे त्याबाबत आम्हाला काही बोलणे योग्य नाही”, असेही बावनकुळे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी