
नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.)।ओमानमधील भारतीय दूतावासाने एमटी सेट्टेबेलो जहाजावरील अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नरिकांचे पार्थिव भारतात पाठवण्यात आल्याची माहिती दिली.
ओमानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी पुष्टी केली की, एमटी सेट्टेबेलो या जहाजावरील अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांचे पार्थिव भारतात पाठवण्यात आले आहेत. या मृतांमध्ये आदित्य शर्मा आणि शिवानंद चौरसिया यांचा समावेश आहे. दूतावासाने शोकाकुल कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
गेल्या बुधवारी अमेरिकन सैन्याने या जहाजावर हल्ला केला होता. अमेरिकेने आरोप केला होता की, हे जहाज इराणी बंदरांवरील नाकेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत होते. या जहाजावर एकूण २४ भारतीय खलाशी कार्यरत होते. त्यापैकी २१ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले, तर तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता.
या घटनेबाबत भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून या हल्ल्याबाबत तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांवर अशा प्रकारची प्राणघातक कारवाई कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजदूतांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जी-७ शिखर परिषदेत हा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. समुद्री व्यापारात निर्माण होत असलेल्या अडचणी आणि भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
समुद्री मार्ग आणि खलाशांच्या सुरक्षेची खात्री करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. तसेच, तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्यावर त्यांनी भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode