
रायगड, 17 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील क्रांतीनगर परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून १६ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे क्रांतीनगर, खोपोली येथे घडली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकून घरात प्रवेश केला.
यानंतर चोरट्याने घरातील हॉलमध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटातील ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. घरफोडीची घटना लक्षात येताच संबंधितांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)