
वॉशिंग्टन, 17 जून (हिं.स.)।अमेरिकेतील टेक्सास राज्यात एका भारतीय कर्मचाऱ्याने आपल्या मालकाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. ऋषिकेश राज मिसाळा नावाच्या या कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, नोकरी आणि व्हिसा कायम ठेवण्यासाठी त्याच्या मालकाने त्याच्याकडे सुमारे 94 लाख रुपये (1 लाख डॉलर्स) मागितले.
ऋषिकेश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे भारतीय-अमेरिकन मालक साई जितेंद्र कलागरा यांनी पैसे देण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव टाकला. तक्रारीनुसार, जेव्हा ऋषिकेश यांनी या पैशांबाबत प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. मालकाने त्यांची तक्रार अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) विभागाकडे करणार असल्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या वडिलांनाही इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप ऋषिकेश यांनी केला आहे. मात्र, न्यायालयात हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
ऋषिकेश 2023 मध्ये आपली मास्टर्स पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेले होते. त्यानंतर त्यांना एच-१ बी व्हिसा प्रायोजित करणाऱ्या एका कंपनीत नोकरी मिळाली. हा व्हिसा अमेरिकन कंपन्यांना परदेशी व्यावसायिकांना नोकरी देण्याची परवानगी देतो. या नोकरीच्या माध्यमातून अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळण्याची त्यांना आशा होती.
मात्र, कंपनीत रुजू झाल्यानंतर त्यांना ‘बेंच’वर ठेवण्यात आले. म्हणजेच, कर्मचाऱ्याकडे कोणताही सक्रिय प्रकल्प किंवा काम नसते. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, प्रत्यक्ष काम नसतानाही कागदोपत्री नोकरी सुरू असल्याचे दाखवण्यासाठी आणि त्यांचा एच-१ बी व्हिसा सुरक्षित ठेवण्यासाठी ऋषिकेशकडे मोठी रक्कम मागण्यात आली.
तसेच, कंपनीने त्यांच्या वेतनाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही रोखून धरल्याचा आरोप आहे. ही कागदपत्रे नोकरी बदलण्यासाठी किंवा व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. व्हिसा गमावण्याच्या भीतीपोटी आपण सुमारे 8,800 डॉलर्स रोख स्वरूपात दिल्याचे ऋषिकेश यांनी सांगितले.
आता ऋषिकेश यांच्या कायदेशीर पथकाने कंपनीवर मानव तस्करी आणि सक्तीची मजुरी यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने थकीत वेतन आणि जबरदस्तीने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात सुमारे 97,248 डॉलर्स भरपाई द्यावी.
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिकेत एच-१ बीव्हिसा कार्यक्रमाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. या व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीय नागरिक घेतात. 2024 च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत मंजूर झालेल्या एकूण एच-१ बीव्हिसांपैकी 71 टक्के व्हिसा भारतीय नागरिकांना मिळाले आहेत. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांसाठी हा व्हिसा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode