मुंबईत फिट इंडिया सायक्लोथॉन अंतर्गत सायकलिंग बाय द सी उपक्रमाचे आयोजन
मुंबई, 17 जून (हिं.स.) - फिट इंडिया मोहिमेच्या माध्यमातून अधिक सुदृढ, आरोग्यदायी आणि सक्रिय राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा भाग म्हणून मुंबईत एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत केंद्रीय युवा व्यवहा
क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया


मुंबई, 17 जून (हिं.स.) - फिट इंडिया मोहिमेच्या माध्यमातून अधिक सुदृढ, आरोग्यदायी आणि सक्रिय राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा भाग म्हणून मुंबईत एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वरळी कोस्टल सायकल ट्रॅकवर फिट इंडिया सायक्लोथॉन - सायकलिंग बाय द सी ही सायकल रॅली पार पडली.या उपक्रमात फिटनेस प्रेमी, सायकलस्वार, युवा प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेली बांधिलकी या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.

डॉ. मांडविया यांनी या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यानंतर ते स्वतः देखील सायकल चालवत या रॅलीत सहभागी झाले. यावेळी डॉ. मांडविया यांनी उपस्थितांशी संवादही साधला. तंदुरुस्तीला एका लोकचळवळीचे रूप देण्यासाठी तसेच, सक्रिय आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पाला पुढची दिशा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

तंदुरुस्ती हा विकसित भारताचा एक मुख्य आधारस्तंभ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुरस्कार केला असल्याचे मांडविया यावेळी म्हणाले. फिट इंडिया चळवळ देशातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारण्यासाठी आणि तंदुरुस्तीला आपल्या रोजच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रेरित करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सायकल चालवण्याचे व्यापक महत्त्वही मांडविया यांनी अधोरेखित केले. वाहतुकीच्या शाश्वत पर्यायांचा अवलंब करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पश्चिम आशियातील सद्यस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन पुरवठ्याच्या संकटाचा संदर्भही त्यांनी यानिमीत्ताने मांडला. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे एक शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम माध्यम म्हणून सायकल चालवण्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सायकल चालवणे हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर त्यामुळे पर्यावरणीय शाश्वतता आणि ऊर्जा बचतीसाठी देखील योगदान देता येते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

गेल्या दोन वर्षांत फिट इंडिया चळवळीत लाखो नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. या लोकसहभागातून संपूर्ण देशात तंदुरुस्तीची एक नवी संस्कृती रुजत असल्याची प्रचिती येते , असे ते म्हणाले.

यावेळी मांडविया यांनी सायकल चालवण्यामुळे होणाऱ्या विविध लाभांचीही माहिती दिली. सायकल चालवणे हा तंदुरुस्तीचा एक प्रभावी मंत्र आहे. यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा घडून येते, तसेच एकंदरीत जीवनमानाचा दर्जाही उंचावतो, असे त्यांनी सांगितले.

तंदुरुस्ती हा राष्ट्रीय विकासाचा एक प्रमुख कणा आहे असे ते म्हणाले. एक तंदुरुस्त नागरिक आरोग्यसंपन्न समाज घडवतो, आणि हा आरोग्यसंपन्न समाजच एका समृद्ध राष्ट्राचा पाया असतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यामुळे तंदुरुस्ती हा विकसित भारताच्या जडणघणीच्या दिशेने जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नियमित शारीरिक सक्रीयतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. फिट इंडिया सायक्लोथॉन हा उपक्रमही याच प्रयत्नांचा एक भाग आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळी अंतर्गत अपेक्षित असलेली तंदुरुस्तीची संस्कृती आणि लोकसहभागाला अधिक बळकटी देणे हाच केंद्र सरकारचा उद्देश आहे. या माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारताच्या वाटचालीला अधिक गती मिळणार आहे.

या कार्यक्रमात चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, ताहा शाह बदुशा, ऐश्वर्या राज भाकुनी आणि ऑलिम्पिक कुस्तीपटू तसेच पोलीस उपआयुक्त नरसिंग यादव यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande