
नवी दिल्ली, 17 जून (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीचे कौतुक केले आणि या स्पर्धेला मिळालेली विक्रमी उपस्थिती व प्रेक्षकसंख्या यांवर प्रकाश टाकला. 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये जय शाह यांनी नमूद केले की, सुरुवातीच्या वीकेंडला (शुक्रवार ते रविवार) जवळपास ४५,००० चाहत्यांनी सामन्यांना हजेरी लावली.
जय शाह यांनी हे देखील नमूद केले की, रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतात 'जिओहॉटस्टार'वर २५ दशलक्षाहून अधिक 'युनिक' प्रेक्षकांनी पाहिले, तर यूकेमध्ये 'स्काय स्पोर्ट्स'वर महिला टी-२० विश्वचषकाच्या सामन्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक प्रेक्षकसंख्या नोंदवली गेली.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ ची ही एक जबरदस्त सुरुवात आहे. सुरुवातीच्या वीकेंडला (शुक्रवार-रविवार) बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि साऊथम्प्टन येथे जवळपास ४५,००० चाहत्यांची उपस्थिती होती. आयसीसीच्या महिला स्पर्धेसाठीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सुरुवातीचा वीकेंड आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी भारतात 'जिओहॉटस्टार'वरील थेट डिजिटल प्रेक्षकसंख्या २५ दशलक्ष 'युनिक' युजर्सच्या पुढे गेली. जी मागील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या एकूण प्रेक्षकसंख्येपेक्षाही अधिक आहे, असेही ते म्हणाले.
यूकेमध्ये स्काय स्पोर्ट्सवरील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या (पीक व्ह्यूअरशिप) ही कोणत्याही महिला टी-२० विश्वचषक सामन्यासाठीची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या होती. भारत, यूके आणि जगभरात महिला क्रिकेटने सुरुवातीच्या वीकेंडपासूनच इतिहास घडवण्यास सुरुवात केली आहे, असे त्यांनी 'एक्स' पोस्टमध्ये पुढे नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे