
लखनऊ, १७ जून (हिं.स.) उत्तर प्रदेशातील सोहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील पंचायत राज, अल्पसंख्याक कल्याण, मुस्लिम वक्फ आणि हज विभागांचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी दावा केला आहे की, समाजवादी पक्षात फूट पडणार आहे. त्यांनी असेही नमूद केले की, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने एसपीच्या फुटीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षांतर आणि फुटीच्या चर्चेदरम्यान, आता उत्तर प्रदेशच्या राजकारणाबाबत एक मोठा दावा समोर आला आहे. हा दावा एसबीएसपीचे अध्यक्ष आणि मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. बुधवारी आपल्या सोशल मीडिया खात्यावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार आहे. एसपीचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सादर केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, खाणकाम आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्यांचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याला माहीत आहे. फास आवळत असल्याने समाजवादी पक्ष चिंतेत आहे.
ओम प्रकाश राजभर यांनी असाही दावा केला आहे की, महाराष्ट्र आणि बंगाल तर सोडाच, पण संपूर्ण समाजवादी पक्ष भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने राजभर यांचा दावा पोकळ असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, त्यांना सतत मूर्खपणाच्या गोष्टी बोलण्याची सवय आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे