
- महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उष्णतेच्या लाटांचा इशारा- मध्य भारतात सुमारे 65 टक्के पावसाची तूट
मुंबई, 17 जून (हिं.स.) - राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांना उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा वेग कमी झाला असून जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याचा असलेला प्रभाव कमकुवत झाल्यावर मान्सूनचे वारे वेगाने वाहतील. पुढील 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि इतर भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जूनचा तिसरा आठवडा सरत आला तरी मान्सूनने अद्याप देशाचा मोठा भाग व्यापलेला नाही. 17 जूनच्या सकाळी घेतलेल्या उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकवर मान्सूनचे ढग नाहीत. या राज्यांमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. हवामान विभागाच्या मते, देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. म्हणजेच, देशाच्या 40% भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात मजबूत कमी दाबाचे क्षेत्र तयार न होणे हे आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 4 ते 16 जून या कालावधीत मध्य भारतात सुमारे 65 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. देशातील सर्व हवामान विभागांमध्ये ही सर्वाधिक तूट आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांत अद्याप सामान्य मान्सूनी पाऊस झालेला नाही. हाच तो काळ असतो, जेव्हा खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. त्यामुळे मान्सूनची ही मंद गती केवळ हवामानाचा विषय न राहता कोट्यवधी शेतकरी आणि देशाच्या अन्नसुरक्षेशी संबंधित विषय बनली आहे.
हवामान विभागाने 19 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा आणि दमट हवामानाचा इशारा जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
4 जून रोजी केरळममध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून 13 दिवसांत केवळ 19 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 7 दिवसांपासून तो तेलंगणातील भद्राचलम येथे स्थिरावला आहे. यामुळेच छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पावसाला उशीर झाला आहे. मान्सूनचा पाऊस जरी झाला नसला तरी, मान्सूनपूर्व घडामोडी आणि स्थानिक प्रणालींमुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये पारा 40°C किंवा त्याखाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशाला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे.
पुढील दोन दिवसांच्या हवामानाचा अंदाज पाहिल्यास गुुरुवार, 18 जून रोजी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता. बिहारमध्ये काही ठिकाणी 50-70 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. अनेक ठिकाणी 40-60 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
शुक्रवार, 19 जून रोजी सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पावसासह 40-60 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस सुरू राहू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी