जळगाव - पाचोऱ्यात गॅस कटरने एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांनी उधळला
जळगाव, 17 जून (हिं.स.) पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा डाव जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावर
जळगाव - पाचोऱ्यात गॅस कटरने एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांनी उधळला


जळगाव, 17 जून (हिं.स.) पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा डाव जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळ काढावा लागला. त्यामुळे एटीएममधील सुमारे ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. क्रेटा कारमधून बसून पळ काढणाऱ्या या चोरट्यांचा पोलिसांनी धुळे जिल्ह्यापर्यंत थरारक पाठलाग केला असून, सध्या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएम केंद्रात काही अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोरा पोलीस ठाण्याचे हवालदार हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच एटीएम मशीन गॅस कटरने कापण्यात आल्याचे आढळून आले. मशीनमधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट बाहेर काढून ते काळ्या रंगाच्या क्रेटा कारमध्ये ठेवण्याची तयारी सुरू होती. घटनास्थळी तीन संशयित तरुण उपस्थित होते.

मात्र, पोलिसांना पाहताच त्यांनी कॅश कॅबिनेट तिथेच सोडून वाहनातून तारखेडा मार्गे पलायन केले. प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक एमएच-४९-सीएस-७०२८ असा आहे. चोरट्यांनी पळ काढताच पाचोरा पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग थेट धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत करण्यात आला. मात्र, अंधाराचा आणि वेगाचा फायदा घेत संशयित पसार होण्यात यशस्वी ठरले.या घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी तातडीने हालचाली करत सर्व टोल नाक्यांवर संशयित क्रेटा कारची माहिती प्रसारित केली आहे. तसेच धुळे जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि शेजारील मध्य प्रदेश (MP) पोलीस नियंत्रण कक्षालाही वायरलेस संदेश पाठवून सतर्क करण्यात आले आहे.

दरम्यान, एटीएममध्ये तब्बल ८,८९,७०० रुपये इतकी रोकड असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे ही संपूर्ण रक्कम चोरीस जाण्यापासून वाचली. अन्यथा चोरट्यांनी एटीएममधील लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. मात्र दुसरीकडे, एवढी गंभीर घटना घडूनही स्टेट बँकेचे संबंधित अधिकारी, एटीएम तंत्रज्ञ किंवा देखभाल करणारे कर्मचारी बराच वेळ घटनास्थळी न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाही तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande