शिवसेना-उबाठा गटाचे 6 खासदार दिल्लीत, चर्चांना उधाण
मुंबई, 17 जून (हिं.स.) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे 6 खासदार मंगळवारी रात्रि चार्टर्ड विमानाने दिल्लीत पोहचले आहेत. या खासदारांची
उद्धव ठाकरे संग्रहित फोटो


मुंबई, 17 जून (हिं.स.) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे 6 खासदार मंगळवारी रात्रि चार्टर्ड विमानाने दिल्लीत पोहचले आहेत. या खासदारांची लोकसभा अध्यक्षांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. या खासदारांची बैठक श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी होण्याची शक्यता असून, त्यानंतर महत्त्वाची पत्रकार परिषदही घेतली जाऊ शकते.दरम्यान, शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी दावा केला आहे की, ऑपरेशन टायगर अंतर्गत गेल्या महिनाभरापासून या खासदारांशी चर्चा सुरू होती आणि आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दुसरीकडे, उबाठा-गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर गंभीर आरोप केले आहेत.

राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला की, काही खासदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली जात आहे.

राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपना सपना मनी मनी. महाराष्ट्रातील खासदारांना आज रात्री पक्ष बदलण्यासाठी 15 कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले जात आहेत. हे अत्यंत लाजिरवाणे आहे.” मात्र, यापूर्वी संजय राऊत यांनी खासदारांच्या पक्षांतराच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच संकेत दिले होते की, जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर त्याला अडवले जाणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “ज्याला जायचे आहे तो आनंदाने जाऊ शकतो. मी कधीही कोणावर दबाव आणलेला नाही. जर कोणाला जायचे असेल तर त्याला जाऊ द्या. कोणाला जबरदस्तीने रोखण्यात अर्थ नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली आहे, त्यांना भविष्यात त्याचा पश्चात्ताप होईल.” असा इशारा ठाकरे यांनी दिला होता.

सध्या दिल्लीत होणाऱ्या संभाव्य बैठका आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. जर 6 खासदारांच्या गटबदलाच्या बातम्या खऱ्या ठरल्या, तर तो लोकसभा पातळीवर शिवसेना (यूबीटी) साठी मोठा राजकीय धक्का मानला जाईल.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande