
अँटिग्वा, १७ जून, (हिं.स.) - वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आणि शमर जोसेफ यांनी दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोशुआ दा सिल्वा आणि अमीर जांगू यांनाही दुसरी संधी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळे अल्झारी आणि शमर यांना संघाबाहेर राहावे लागले होते. या दोघांनी शेवटचा कसोटी सामना २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यांच्या पुनरागमनामुळे वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीला बळकटी मिळाली आहे, ज्यात केमार रोच आणि जेडन सील्स यांचाही समावेश आहे.
जोशुआ दा सिल्वाने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज चॅम्पियनशिपमध्ये सात डावांत ४१३ धावा करून तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.डावखुरा फलंदाज अमीर जांगूचेही बऱ्याच कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. देशांतर्गत हंगामात सात डावांमध्ये ४११ धावा करून त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते.
मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाले की, प्रत्येक कसोटी मालिका ही संघासाठी आपली ओळख अधिक मजबूत करण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक संधी असते.ते म्हणाले की, श्रीलंका एक मजबूत संघ आहे आणि वेस्ट इंडिजला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. सॅमी यांनी स्पष्ट केले की, क्रिकेटपटू १२ जूनपासून अँटिग्वामध्ये प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहेत. ज्यामुळे संघाला आपली तयारी सुधारण्याची संधी मिळत आहे.
ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्राचा एक भाग आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिज सध्या नवव्या क्रमांकावर आहे. पहिला कसोटी सामना २५ ते २९ जून दरम्यान नॉर्थ साउंड येथे, तर दुसरा ३ ते ७ जुलै दरम्यान खेळला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे