
नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.)।नीट-यूजी परीक्षेतील गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘टेलिग्राम’वर तात्पुरती बंदी घातली आहे. या निर्णयानंतर देशातील राजकारण तापले असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने २२ जून २०२६ पर्यंत भारतात टेलिग्रामचा वापर बंद केला आहे. या निर्णयाला विरोध करत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी मोदी सरकारचा हा नवा फंडा आहे. चोराला पकडण्याऐवजी पीडिताच्याच दाराला कुलूप लावण्याचा प्रकार सुरू आहे.”
देशातील कोट्यवधी विद्यार्थी अनेक वर्षांपासून टेलिग्रामच्या माध्यमातून अभ्यास करत असून, त्यांना नोट्स, टेस्ट सिरीज आणि गटचर्चेची सुविधा मिळते. मग विद्यार्थ्यांकडून ही सुविधा हिरावून घेणे हे प्रश्नपत्रिका फुटीवरचे उत्तर कसे ठरू शकते, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
सरकारच्या या निर्णयाच्या परिणामकारकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा उपाय अजिबातच ‘फुलप्रूफ’ नसल्याचे सांगत, “हे देशातील प्रत्येक मुलाला आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या माफियांनाही चांगलेच माहीत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. “जर यानंतरही प्रश्नपत्रिका फुटणे थांबले नाही, तर पुढे सरकार व्हॉट्सअॅपवर बंदी घालणार का?” असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर करण्यात येणाऱ्या कडक तपासणी व्यवस्थेवर टीका करत राहुल गांधी म्हणाले, “परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाईल, त्यांच्या खिशांनाही कात्री लावली जाईल. प्रश्नपत्रिका हवाई दलाच्या माध्यमातून पाठवल्या जातील. म्हणजे दिखाऊपणात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. मात्र, समस्येच्या मूळावर एकही प्रहार केला जाणार नाही.”
प्रश्नपत्रिका फुटीचे रॅकेट सरकारच्या नाकाखालीच फोफावत असून, त्यामुळे देशातील युवकांना मोठा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे सगळे दिखावे थांबवा आणि विद्यार्थ्यांना त्रास देण्याऐवजी थेट पेपरफुटी माफियांवर कारवाई करा,” असा सल्लाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode