ऐतिहासिक वारसा जपला जाणार; पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार - अश्विनी वैष्णव
पुणे, 17 जून (हिं.स.)। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत सुरू असलेल्या बंद होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत
grdf


पुणे, 17 जून (हिं.स.)।

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत सुरू असलेल्या बंद होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद केला जाणार नाही.

या संदर्भात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लक्षात घेता तो कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी अश्विनी वैष्णव पुणे दौऱ्यावर आले असताना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही चर्चा झाली. त्यावेळी वैष्णव यांनी केंद्र सरकारसमोर पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या आश्वासनामुळे कर्मचारी, श्रोते आणि पुणेकरांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाली असून, पुणे आकाशवाणीचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande