
नागपुरात आर्थिक गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक
नागपूर, 18 जून (हिं.स.) : नागपूर शहरात डिजिटल करन्सी आणि गुंतवणुकीच्या नावाखाली चालवण्यात आलेल्या मोठ्या आर्थिक फसवणूक रॅकेटचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे. “फ्री कॉईन” आणि “मर्चंट कॉईन” या बनावट योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 2 मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात नागपुरातून मेहुल शिवाजी दीक्षित आणि पंजाबच्या चंदीगड येथील राकेश मोहनलाल गर्ग ऊर्फ राकेश अग्रवाल या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात उघड झाले की या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने डिजिटल अॅसेट्स आणि चेन सिस्टीमच्या नावाखाली गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले.आरोपींनी “सीएलबीपी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड” या नावाने कंपनी उभी करून “फ्युचर डिजिटल ऍसेट्स” नावाची योजना राबवली होती. या योजनेत 100 दिवसांत चक्रवाढ परतावा आणि दरमहा मोठे कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. फिर्यादी महिलेसह अनेक गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन सुमारे 25 जणांकडून 5 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली. दरम्यान, पीडितांना स्वतःच्या डिजिटल वॉलेटमधील रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच विविध “तांत्रिक अटी” पुढे करत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. संशय बळावल्याने फिर्यादीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांच्या 5 बँक खाती आणि एफडी खाती गोठवून सुमारे 1 कोटी 72 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण 31 हजार 117 गुंतवणूकदारांकडून 15 कोटी 58लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देशभरात 10 लाखांहून अधिक युजर्सना या बनावट डिजिटल करन्सी नेटवर्कशी जोडण्यात आले होते, तर एकट्या नागपूर शहरातच सुमारे 30 हजार नागरिक या जाळ्यात अडकले होते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने तब्बल 500 कोटी रुपयांच्या संभाव्य फसवणुकीचा डाव उधळण्यात यश मिळाले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी