
नवी दिल्ली, १८ जून (हिं.स.)अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी गुरुवारी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली.
गृहमंत्री अमित शाह यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याशी भारत-अमेरिका सहकार्य, विशेषतः दहशतवादविरोधी आणि अमली पदार्थविरोधी क्षेत्रात, अधिक दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत-अमेरिका व्यापक जागतिक सामरिक भागीदारीला पुढे नेण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांचा भारत आणि अमेरिकेच्या नागरिकांना फायदा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे