
सोलापूर, 18 जून (हिं.स.)। सोलापूर शहरातील ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानात पिस्टलचा धाक दाखवून भरदिवसा पाच लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोघा आरोपींना शहर गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत जेरबंद केले आहे. आरोपींकडून पिस्टल, जिवंत काडतुसे, दागिने, मोबाईल फोन आणि दुचाकीसह सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जिलानी मोहम्मद रफिक दामटे (वय ३३) आणि साहिल ऊर्फ भाई नबी नंदियाल (वय २४) अशी आहेत. दोघेही मूळचे सोलापूरचे असून पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत वास्तव्यास होते. तपासादरम्यान रेहान ऊर्फ जड्ड्या रमजान लडाफ ऊर्फ शेख याच्यासोबत त्यांची ओळख झाल्याचे समोर आले. तिघांनी मिळून विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याची माहितीही पोलिस तपासात पुढे आली आहे.घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने चार दिवस रात्रंदिवस तपास केला.तपास पथकाने तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना सोलापुरातूनच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर आणि सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी रेहान शेख याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड