
मॉस्को, 18 जून (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धादरम्यान गुरुवारी एक मोठे वळण आले. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मॉस्कोतील सर्व प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहेत.
रशियाची नागरी विमान वाहतूक संस्था रोसावियात्सियाने हवाई क्षेत्राची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उड्डाणे तात्पुरती निलंबित करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.रशियन अधिकाऱ्यांचा दावा आहे की, त्यांनी मॉस्कोच्या आकाशात युक्रेनचे १८० ड्रोन पाडले आहेत. या मोठ्या हल्ल्यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, युक्रेनी सैन्याने याच आठवड्यात दुसऱ्यांदा मॉस्कोमधील एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केले आहे.
एका निवेदनात झेलेन्स्की म्हणाले, “आमच्या शहरांवर आणि गावांवर रशियाने केलेल्या हल्ल्यांना हे पूर्णपणे योग्य उत्तर आहे. आमच्या सैनिकांनी या युद्धाला चालना देणाऱ्या रशियाच्या युद्धयंत्रणेला मोठा फटका दिला आहे.” याशिवाय, झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की युक्रेनी सैन्याची कारवाई केवळ मॉस्कोपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या सैन्याने रशियातील रोस्तोव प्रदेशासह युक्रेनच्या त्या भागांमध्येही अनेक तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त केले, ज्यांवर रशियाने बेकायदेशीररीत्या ताबा मिळवला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण रशियात उच्च सतर्कता (हाय अलर्ट) घोषित करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode