
मुंबई, 18 जून (हिं.स.) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या सर्व खासदारांना वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातून वेगळी भूमिका घेतलेल्या सहा खासदारांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गुप्तचर विभागाच्या वायरलेस संदेशानुसार गृह विभागाने त्यांना Y+ सुरक्षा देण्याचे आदेश जारी केले आहेत.
सुरक्षा वाढवण्यात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), संजय जाधव (परभणी), संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) यांचा समावेश आहे. अलीकडील संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर खासदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुप्तचर विभागाच्या संदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित जिल्हा व आयुक्तालय स्तरावरील समित्यांनी पुढील बैठकीत सुरक्षा कायम ठेवणे, वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घ्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. Y+ सुरक्षा श्रेणीत साधारणपणे सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) आणि 24 तास सुरक्षा व्यवस्था दिली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलनानुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते.
राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी वेगळा गट बनवण्याची भूमिका घेतली आहे. उद्धवसेनेने संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी पक्षादेश (व्हिप) जारी करण्यात आला होता. मात्र हा व्हिप झुगारून ६ खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे खासदार शिंदेसेनेत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून त्या बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
दरम्यान, खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे. शरद पवार यांचाही फोन आला. आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल अशी अप्रत्यक्ष धमकीच शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे बंडखोर खासदारांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणांनी खबरदारी घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी