
लखनऊ, १७ जून (हिं.स.)कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या शानदार शतकांच्या आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७० धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका जिंकली. या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने आपल्या निर्धारित ५० षटकांत ४०२ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय डावाचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठीची २२४ धावांची भागीदारी. गिलने कर्णधाराला साजेशी १५४ धावांची खेळी केली, तर इशान किशनच्या १२५ धावांनी संघाला मजबूत स्थितीत आणले.
४०३ धावांच्य लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने संघाला लक्ष्याच्या जवळ पोहोचता आले नाही. रहमत शाहने संघर्ष करत ७९ धावा केल्या, पण इतर फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानचा संघ ४४.३ षटकांत २३२ धावांवर सर्वबाद झाला. दरविश रसूली दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला आणि त्याला पुन्हा फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार सर्वात यशस्वी ठरले. त्यांनी प्रत्येकी तीन बळी घेत अफगाण फलंदाजी उद्ध्वस्त केली.
यापूर्वी, धरमशाला येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना २० जून रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे