हैदराबादमध्ये 825 किलो बनावट पनीर जप्त
‘चीज ऍनालॉग’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक अनेक कारखाने परवान्याविना सुरू असल्याचे उघड हैदराबाद, 19 जून (हिं.स.) : तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आयुक्तांच्या टास्क फोर्सने मोठी कारवाई करत बनावट आणि भेसळयुक्त पनीर विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला आ
हैद्राबाद पोलिसांनी जप्त केलेले बनावट पनीर


‘चीज ऍनालॉग’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

अनेक कारखाने परवान्याविना सुरू असल्याचे उघड

हैदराबाद, 19 जून (हिं.स.) : तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आयुक्तांच्या टास्क फोर्सने मोठी कारवाई करत बनावट आणि भेसळयुक्त पनीर विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष छापेमारीदरम्यान पोलिसांनी सुमारे 825 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. हे पनीर ‘चीज अॅनालॉग’पासून तयार करून ग्राहकांना अस्सल पनीर म्हणून विकले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या विशेष पथकांनी शहरातील सुमारे 45 किरकोळ दुकाने आणि 8 पनीर उत्पादन कारखान्यांची तपासणी केली. या तपासणीत अनेक विक्रेते ‘चीज अॅनालॉग’ला खरे पनीर असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे आढळले. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, ‘चीज अॅनालॉग’ हे खरे दुग्धजन्य उत्पादन नसून ते दूधाऐवजी वनस्पतीजन्य चरबी, स्टार्च, निकृष्ट दर्जाचे किंवा कृत्रिम दूध तसेच इतर दुग्धविरहित घटक वापरून तयार केले जाते. हे उत्पादन बाजारात ‘पनीर’, ‘मलाई पनीर’, ‘मिल्क पनीर’ आणि ‘फ्रेश पनीर’ अशा आकर्षक नावांनी विकले जात होते.जप्त करण्यात आलेल्या बहुतांश पॅकेट्सवर उत्पादन तारीख, बॅच क्रमांक, कालबाह्यता तारीख (एक्पायरी डेट) तसेच इतर आवश्यक माहिती नमूद केलेली नव्हती. त्यामुळे अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

पोलिस उपायुक्त वैभव गायकवाड यांनी सांगितले की, अधिक नफा मिळवण्यासाठी काही व्यापारी कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील उत्पादकांकडून हे बनावट पनीर स्वस्त दरात खरेदी करत होते. त्यानंतर ते हैदराबादमध्ये अस्सल पनीरच्या किंमतीत विकले जात होते. काही ठिकाणी कोणत्याही वैध परवान्याशिवाय हे उत्पादन मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘प्रीमियम पनीर’ या नावाने पुन्हा पॅक करण्यात येत असल्याचेही आढळले.

तपासादरम्यान अनेक कारखान्यांमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनास आले. काही कारखाने FSSAI (अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण) परवान्याशिवाय कार्यरत होते. पनीरचे वजन वाढवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च, अतिरिक्त पाणी आणि काही ठिकाणी अखाद्य पदार्थ मिसळले जात असल्याचेही आढळले. उपायुक्तांनी इशारा दिला की, अशा प्रकारच्या भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे फूड पॉइझनिंग, गंभीर ऍलर्जी आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी जप्त केलेल्या पनीरचे नमुने प्रयोगशाळा चाचणीसाठी पाठवले असून येत्या काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना पनीर खरेदी करताना केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पॅकेटवरील लेबल, उत्पादक कंपनीचे नाव, उत्पादन व कालबाह्यता तारीख यांची खात्री करूनच खरेदी करावी, असे सांगितले आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande