संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला नवी गती : राजनाथ सिंह
नागपुरात 10 हजार टन क्षमतेच्या ऍल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचा शुभारंभ नागपूर, 19 जून (हिं.स.) : नागपुरातील अत्याधुनिक ऍल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरे
राजनाथ सिंह  फाईल फोटो


नागपुरात 10 हजार टन क्षमतेच्या ऍल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचा शुभारंभ

नागपूर, 19 जून (हिं.स.) : नागपुरातील अत्याधुनिक ऍल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. तसेच स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतांचा नवा अध्याय लिहिणार असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नागपूरच्या अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्ट्री परिसरात आज, शुक्रवारी 10 हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे राजनाथ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार तसेच यंत्र इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजनाथ सिंह यांनी हा प्रकल्प भारताच्या बदलत्या आणि आत्मविश्वासपूर्ण विचारसरणीचे प्रतीक असल्याचे सांगितले. पूर्वी ज्या गरजांसाठी भारताला परदेशांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या गरजा आज देशातील उद्योग आणि नागरिक स्वतः पूर्ण करण्यास सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, जागतिक संघर्ष आणि युद्धांच्या काळात पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आवश्यक साहित्य आणि साधनसामग्रीचे उत्पादन देशातच होणे अत्यंत गरजेचे आहे.प्रस्तावित ऍल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाला संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची राष्ट्रीय संपदा मानले जात आहे. या प्रकल्पामुळे संरक्षण, एरोस्पेस आणि अन्य सामरिक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च क्षमतेच्या आणि अचूकतेच्या ऍल्युमिनियम मिश्रधातू उत्पादनांची निर्मिती देशात मोठ्या प्रमाणात करता येणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे महत्त्वाच्या ऍल्युमिनियम घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वदेशी उत्पादन क्षमतांना चालना मिळेल. तसेच केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळ मिळून संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सामरिक साहित्याचे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.हा प्रकल्प भारताच्या संरक्षण औद्योगिक पायाभूत सुविधांना अधिक सक्षम बनविण्यासोबतच तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande