
किंशासा, 19 जून (हिं.स.)।डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी)मध्ये इबोला विषाणूचा धोका सातत्याने वाढत आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील इबोलाच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या आता ८९६ वर पोहोचली असून, या घातक आजारामुळे आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, बुधवारी इटुरी आणि उत्तर किवू प्रांतांमध्ये इबोलाचे २१ नवे रुग्ण आढळले, ज्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. हा उद्रेक आता पूर्व काँगोमधील इटुरी, उत्तर किवू आणि दक्षिण किवू या तीन प्रांतांतील ३३ आरोग्य क्षेत्रांमध्ये पसरला आहे. सध्या ३८३ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यांना विलगीकरणात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ७८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर आणखी ११ रुग्णांच्या तपासणी अहवालात अलीकडेच संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र प्रशासनाची चिंता वाढवणारी बाब म्हणजे बुधवारीच १५१ संशयित रुग्णांची नोंद झाली असून, त्यामध्ये ३५ मृत्यूंचा समावेश आहे. अधिकाऱ्यांकडून सध्या ६,३६७ अशा व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, ज्या संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या. अहवालात इशारा देण्यात आला आहे की, पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या दर आठवड्याला वाढत असून, याचा अर्थ समुदाय स्तरावर संसर्गाचा प्रसार अद्याप सुरू आहे. आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने आणि अधिक प्रभावीपणे राबवण्यात आल्या नाहीत, तर हा आजार लवकरच नव्या भागांमध्येही पसरण्याची शक्यता आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे आपत्कालीन मदत समन्वयक टॉम फ्लेचर यांनी युगांडामध्ये इबोलाशी मुकाबला करण्यासाठी ४० लाख अमेरिकी डॉलरच्या मदतीला मंजुरी दिली आहे. ही रक्कम संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रीय आपत्कालीन प्रतिसाद निधी (सीईआरएफ)मधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.युनिसेफ आणि जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाही या मोहिमेत सहकार्य करत आहेत. जागतिक अन्न कार्यक्रमाने रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ६,००० हून अधिक अन्न पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. काँगोमध्येही संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी या आठवड्यात १६ मेट्रिक टनांहून अधिक वैद्यकीय साहित्य पोहोचवले आहे.
किन्शासा आंतरराष्ट्रीय विमानतळावर संसर्गावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी नवीन आरोग्य तपासणी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनी ज्युलियन हार्नेस यांची वरिष्ठ इबोला समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून, ते मदतकार्यांमध्ये समन्वय साधण्याबरोबरच गरजूंपर्यंत मदत जलदगतीने पोहोचवण्याचे काम पाहणार आहेत.
इबोला हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार असून, त्याचा मृत्युदर सुमारे ५० टक्क्यांपर्यंत असू शकतो. संक्रमित प्राणी किंवा संक्रमित व्यक्तींच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांच्या थेट संपर्कातून हा विषाणू पसरतो. वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, डीआरसीमधील हा इबोलाचा १७वा उद्रेक असून, तो अधिकृतपणे १५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode