
कोलकाता , 19 जून (हिं.स.)।पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील अंतर्गत संकट आणखी गडद झाले आहे. शुक्रवारी पक्षाचे दोन प्रमुख नेते, माजी राज्यमंत्री ज्योती प्रिय मल्लिक आणि सिलीगुडीचे महापौर गौतम देव यांनी आपल्या-आपल्या पदांचा राजीनामा दिला. २०२६ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात बंड, राजीनामे आणि असंतोषाचे सत्र सुरू असून, टीएमसीच्या २८ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे संकट मानले जात आहे.
ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू आणि जुने सहकारी ज्योती प्रिय मल्लिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा (वर्किंग कमिटी) राजीनामा दिला. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत त्यांची प्रकृती खूपच खालावली असून रक्तातील साखरेचे प्रमाण असामान्यरीत्या वाढले आहे. तसेच ते मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. “जेव्हा कामच करता येत नाही, तेव्हा पदावर राहण्याला काही अर्थ उरत नाही,” असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पक्षात मोठे फेरबदल करत ज्योती प्रिय मल्लिक यांचा पुन्हा वर्किंग कमिटीमध्ये समावेश केला होता. ज्योती प्रिय मल्लिक हे पाच वेळा आमदार राहिले असून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पक्षाचे सर्वात प्रभावशाली नेते मानले जात होते. ते २०११ ते २०२१ या काळात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते, तर त्यानंतर पुढील तीन वर्षे त्यांनी वनमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. सुमारे १५ महिने तुरुंगात राहिल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवदास मंडल यांनी ज्योती प्रिय मल्लिक यांचा त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या हाबरा मतदारसंघात ३१ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. तुरुंगात गेल्यानंतरही ममता बॅनर्जी यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. डाव्या आघाडीच्या काळातील बेकायदा भरतीप्रकरणे उघडकीस आणल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) आणि भाजपने राजकीय कट रचून त्यांना अडकविल्याचा दावा करत ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान त्यांची बाजू घेतली होती.
दुसरीकडे, उत्तर बंगालमधील टीएमसीचे ज्येष्ठ नेते गौतम देव यांनीही सिलीगुडी महानगरपालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्तांकडे पाठवला आणि तत्काळ शासकीय वाहन व सुरक्षा सुविधांचा त्याग केला. गौतम देव यांचा राजीनामा हा एकटाच नाही. राज्यातील सत्तांतरानंतर टीएमसीमधील अनेक दिग्गज नेते आपल्या पदांवरून पायउतार होत आहेत. यापूर्वी कोलकात्याचे माजी महापौर फिरहाद हकीम आणि बिधाननगरच्या महापौर कृष्णा चक्रवर्ती यांनीही राजीनामे दिले होते. तसेच १७ जून रोजी दार्जिलिंग पर्वतीय भागातील ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि गोरखा प्रादेशिक प्रशासनाचे (जीटीए) मुख्य कार्यकारी अधिकारी अनित थापा यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode