
मुंबई , 19 जून (हिं.स.)।महिला टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑफस्पिनर श्रेयांका पाटील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या जागी युवा लेगस्पिनर प्रेमा रावत हिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
बुधवारी नेदरलँड्सविरुद्धच्या गट-अ सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयांका पाटीलच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
महिला टी-२० विश्वचषक २०२६च्या इव्हेंट टेक्निकल समितीने श्रेयांका पाटीलच्या जागी प्रेमा रावतचा भारतीय संघात समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. २४ वर्षीय प्रेमा रावत सध्या भारत-अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर होती. आता तिला थेट भारतीय महिला टी-२० विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे.
प्रेमाने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नसले, तरी अलीकडच्या काळात तिने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) तसेच महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही तिने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत भारत-अ संघाकडून खेळताना तिने ९.६२ च्या सरासरीने आठ बळी घेतले होते.
श्रेयांका पाटीलने याच वर्षी दुखापतीतून सावरत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या विजयातही ती संघाचा भाग होती. त्या सामन्यात तिने तीन षटकांत १७ धावा देत एकही बळी मिळवला नव्हता. आता तिच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या फिरकी आक्रमणाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, युवा प्रेमा रावतसमोर जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची आणि मोठ्या मंचावर आपली छाप पाडण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode