अखेर पाच दिवसांनी रविकांत तुपकरांचे आंदोलन स्थगित
- गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी बुलढाणा, 19 जून (हिं.स.) : सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रलंबित पिकविमा रक्कम, शेतीपूरक व्यवसायांसाठी अनुदान, सिंचन सुविधा आणि इतर विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून बुलढाण्या
रविकांत तुपकर आंदोलन स्थगित


- गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी

बुलढाणा, 19 जून (हिं.स.) : सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रलंबित पिकविमा रक्कम, शेतीपूरक व्यवसायांसाठी अनुदान, सिंचन सुविधा आणि इतर विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. दरम्यान आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शिष्टाई केल्यानं हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. मंत्री महाजन यांनी रविकांत तुपकर यांची बुलढाण्यातील आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या चार ते पाच दिवसात रविकांत तुपकर यांच्यासोबत बैठक लावण्याचं ठोस आश्वासन दिले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असं आश्वासन दिले. या शिष्टाईमुळे रविकांत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सरकारला वेळ दिला आहे. चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आणि मागण्या मान्य झाल्या, तर चांगलं. अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन उग्र रूपात सुरू करू. शेतकऱ्यांना यापुढं कोणतीही भ्रामक आश्वासनं चालणार नाहीत. पुढे मोठ्या जनसमर्थासह रस्त्यावर उतरू. हा संघर्ष थांबलेला नाही, तो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरुच राहणार आहे, असे तुपकर यांनी म्हटले आहे.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे. त्यांच्या समस्या सोडवणं हे सरकारचं प्राधान्य आहे. मुख्यमंत्र्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेऊन कर्जमाफी, पिकविमा आणि इतर मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande