
लातूर, 19 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने मोहिम सुरू केली असून त्या अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत १४ लाख ५४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी जप्त केली आहे. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यास गुटख्याची मोठी खेप शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा करून पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने दि. १९ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास सरकारी दवाखाना ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे लाईन परिसरात सापळा रचला.
यावेळी संशयास्पदरीत्या येणारी काळ्या रंगाची ह्युंदाई क्रेटा (क्रमांक MH-46-BD-9498) ही कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून चालकास ताब्यात घेतले.
या कारवाईत इरफान चांदपाशा शेख (वय २१ वर्षे, रा. निवाडा, ता. रेणापूर, जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एकूण ४ लाख ५४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू तसेच १० लाख रुपये किमतीची ह्युंदाई क्रेटा कार असा मिळून १४ लाख ५४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis