
वॉशिंग्टन, 19 जून (हिं.स.)।अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारावर टीका करणाऱ्या इस्रायलला कडक इशारा दिला आहे. अनेक आठवड्यांच्या तणावानंतर झालेल्या या कराराचे समर्थन करताना व्हान्स यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे एकमेव खरे सहकारी आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या कराराबाबत खासगी पातळीवर नाराजी असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. इराणसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी हा करार करण्यात आला असून, वॉशिंग्टन आजही इस्रायलचा सर्वात मजबूत आणि महत्त्वाचा मित्र असल्याचे व्हान्स यांनी ठामपणे सांगितले.
व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी त्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले, ज्यांचे मत आहे की या करारामुळे इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर अंकुश बसलेला नाही. काही जणांनी असा दावा केला आहे की या करारामुळे लेबनानमधील हिजबुल्लाविरोधातील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मर्यादा येऊ शकतात. नेतान्याहू नाराज असल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना व्हान्स म्हणाले की, त्यांनी स्वतः पंतप्रधानांकडून अशी कोणतीही तक्रार ऐकलेली नाही. मात्र, त्यांनी इस्रायली मंत्रिमंडळातील काही सदस्यांवर जोरदार टीका केली. व्हान्स म्हणाले, “माझा संदेश स्पष्ट आहे. सध्या जगात डोनाल्ड ट्रम्प हेच असे एकमेव राष्ट्रप्रमुख आहेत, ज्यांना इस्रायलबद्दल सहानुभूती आहे. जर मी इस्रायली मंत्रिमंडळात असतो, तर माझ्या एकमेव शक्तिशाली मित्रावर मी हल्ला केला नसता.”
उपराष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला मिळणाऱ्या अमेरिकी लष्करी मदतीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, इस्रायलच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी दोन-तृतीयांश शस्त्रे अमेरिकेत तयार करण्यात आली असून, त्यासाठी अमेरिकन करदात्यांच्या पैशांचा वापर केला जातो. वृत्तानुसार, अमेरिका सध्या इस्रायलला दरवर्षी सुमारे चार अब्ज डॉलरची लष्करी मदत देते. मात्र, नेतान्याहू यांच्या कार्यालयाने किंवा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हान्स यांच्या वक्तव्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हान्स म्हणाले, “इस्रायलसमोरील समस्या डोनाल्ड ट्रम्प नाहीत. ज्यांना तसे वाटते, त्यांनी वास्तव समजून घेण्याची गरज आहे.”
दुसरीकडे, इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, या करारामुळे इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र धोक्याचे पूर्णपणे निराकरण होत नाही. त्यानंतर नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इस्रायल अमेरिकेसोबतच्या संबंधांना महत्त्व देतो, मात्र दक्षिण लेबनानमध्ये स्वतःच्या सुरक्षेसाठी आपली उपस्थिती कायम ठेवणार आहे.
वाद आणखी तीव्र झाला, जेव्हा व्हान्स यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इस्रायली मंत्री इतामार बेन-ग्वीर आणि बेझलेल स्मोट्रिच यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “तुमचा नेमका प्रस्ताव काय आहे? तुम्ही ९० लाख लोकसंख्येचा देश आहात आणि प्रत्येक राष्ट्रीय सुरक्षा समस्येचे समाधान केवळ हिंसाचारातून होऊ शकत नाही.” त्यांनी या करारामुळे इस्रायलमध्ये निर्माण झालेल्या घबराटीला “विचित्र” असेही संबोधले.
दरम्यान, व्हाइट हाऊसने स्पष्ट केले की, जेडी व्हान्स इराणसोबतच्या तांत्रिक चर्चेसाठी स्वित्झर्लंडला जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कराराची अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, निर्बंधांमध्ये सवलत आणि तात्पुरत्या युद्धविरामानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode