लातूरमध्ये गांजा विक्रीच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद; १२ किलो गांजा जप्त
लातूर, 19 जून (हिं.स.)। जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल
पोलीस कारवाई


लातूर, 19 जून (हिं.स.)। जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजार किंमत ३ लाख १८ हजार ५०० रुपये इतकी आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहर परिसरात गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.

माहितीनुसार सारोळा चौकाजवळील रिंगरोड परिसरात दोन व्यक्ती गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नायब तहसीलदार, शासकीय पंच, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी आणि व्हिडिओग्राफी पथकाच्या उपस्थितीत सापळा रचला. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत दोन संशयितांना पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे कैलास शेषेराव जोगेश्वरी (वय २५) आणि सतीश नामदेव सूर्यवंशी (वय ४५, दोघेही रा. कुष्ठधाम, सारोळा रोड, लातूर) अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातील पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा व तीव्र वास असलेला गांजा आढळून आला. त्याचे वजन १२ किलो ७४० ग्रॅम इतके असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील शेषेराव जाधव नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस कायदा) १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande