वैष्णो देवी यात्रा : हलक्या पावसामुळे भाविकांना दिलासा
कटरा, 19 जून (हिं.स.) : कटरा परिसरात शुक्रवारी पहाटेपासून वातावरणात लक्षणीय बदल पाहायला मिळाला. आकाशात ढगांची दाटी झाली असून त्रिकुटा पर्वत परिसरात थंड वारे वाहत होते. दिवसभर अधूनमधून झालेल्या हलक्या पावसामुळे पवित्र माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी
कटरा येथून वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेले भाविक


कटरा, 19 जून (हिं.स.) : कटरा परिसरात शुक्रवारी पहाटेपासून वातावरणात लक्षणीय बदल पाहायला मिळाला. आकाशात ढगांची दाटी झाली असून त्रिकुटा पर्वत परिसरात थंड वारे वाहत होते. दिवसभर अधूनमधून झालेल्या हलक्या पावसामुळे पवित्र माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तीव्र उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.आल्हाददायक वातावरणात देशभरातून आलेले भाविक कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह जयघोष करत भवनाच्या दिशेने उत्साहाने मार्गक्रमण करत होते. हवामानातील बदलामुळे यात्रेचे वातावरण अधिक आनंददायी बनले.

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे आणि अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे कटरा येथून चालवली जाणारी हेलिकॉप्टर सेवा दुपारनंतर काही प्रमाणात प्रभावित झाली. मात्र बॅटरी कार सेवा, रोपवे (केबल कार) सेवा तसेच घोडे, पिट्ठू आणि पालखी सेवा अखंडपणे सुरू राहिल्या. भाविकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी संपूर्ण मार्गावर आपत्ती व्यवस्थापन पथक, श्राइन बोर्ड प्रशासन, पोलीस विभाग आणि सीआरपीएफचे अधिकारी व जवान तैनात करण्यात आले आहेत. संबंधित यंत्रणा सातत्याने यात्रेवर लक्ष ठेवून असून भाविकांना हवामानानुसार आवश्यक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

देशाच्या विविध भागांतून दररोज हजारो भाविक कटरा येथे दाखल होत आहेत. त्यामुळे भवन परिसर, यात्रा मार्ग तसेच आधार शिबिर कटरा येथे मोठी गर्दी असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक कटरा बाजारात प्रसाद व अन्य वस्तूंची खरेदी करत असल्याने स्थानिक बाजारपेठांनाही चांगली चालना मिळत आहे.

माता वैष्णो देवी भवन तसेच कटरा येथील आधार शिबिरात उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून संपूर्ण यात्रेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून सर्व यंत्रणा सतर्क आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, 18 जून रोजी 43,400 भाविकांनी माता वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शन घेतले, तर 19 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सुमारे 21 हजार भाविकांनी नोंदणी करून भवनाकडे प्रस्थान केले होते. भाविकांची ये-जा अद्यापही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande