
रायगड, 19 जून (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील बुरुमखाण येथे एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 6.45 वाजता बुरुमखाण येथील ए. वन मार्बल दुकानासमोर ही घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासात मयत महिलेचे आरोपीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच महिलेचे तिच्या पतीसोबत वारंवार वाद होत असल्याची माहितीही निष्पन्न झाली आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, वादानंतर ती महिला अनेकदा आरोपीच्या घरी जात असे. 12 जून 2026 रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर ती आरोपीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर अज्ञात कारणावरून आरोपीने तिच्यावर मारहाण करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 91/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)