लातूरात ११ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना अखेर बेड्या
लातूर, 20 जून (हिं.स.)। वर्षानुवर्षे फरार राहून कायद्याला चकवा देणाऱ्या आरोपींविरोधात लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक यश मिळाले असून, ११ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना भादा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्
पोलीस कारवाई


लातूर, 20 जून (हिं.स.)।

वर्षानुवर्षे फरार राहून कायद्याला चकवा देणाऱ्या आरोपींविरोधात लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक यश मिळाले असून, ११ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना भादा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील गंभीर गुन्हे आणि फरार आरोपींच्या प्रकरणांचा सखोल आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

भादा पोलीस ठाण्यात सन २०१५ मध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी गेल्या ११ वर्षांपासून फरार होते. दि. ५ ते ६ ऑगस्ट २०१५ च्या मध्यरात्री प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील परिसरातील चंदनाच्या झाडाचा गाभा अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेला होता. चोरीस गेलेल्या चंदनाची किंमत सुमारे ५ हजार रुपये होती.

याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पळंगे यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६/२०१५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७९ तसेच भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र नितीन गोरख राऊत (वय ४८, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि रामचंद्र उर्फ राम धर्मराज माळी (वय ५०, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे दोघे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.

विशेष शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि विविध ठिकाणी पडताळणी करून या दोन्ही आरोपींचा माग काढला. अखेर त्यांना ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुरवणी दोषारोपपत्रासह न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande