
लातूर, 20 जून (हिं.स.) : कायद्यापासून कितीही वर्षे दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी अखेर न्यायालयासमोर हजर व्हावे लागते, याची प्रचिती लातूर पोलिसांनी पुन्हा एकदा दिली आहे. तब्बल 17 वर्षांपासून फरार असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून शिताफीने अटक केली आहे.
लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2009 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी गोविंद व्यंकटराव डांगे (वय 53, रा. हासोरी बु., ता. निलंगा, जि. लातूर) हा गेल्या 17 वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट तसेच जाहीरनामा जारी केला होता. मात्र, तो सतत आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता.
या प्रकरणात फिर्यादीकडून शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदीच्या नावाखाली 1 लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या व्यक्तीकडून मोटारसायकल देण्याचे आमिष दाखवून 55 हजार रुपये घेऊनही वाहन किंवा पैसे परत न करता फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार विशेष पथक आरोपीचा शोध घेत होते. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुण्यातील लोणी काळभोर परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी हडपसर टोलनाका परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला 18 जून 2026 रोजी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सतीश एन. पाटील यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे आणि संतोष खांडेकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis