
नंदुरबार, 20 जून (हिं.स.) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 21 जून 2026 रोजी संपूर्ण जगभर बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यापक पातळीवर योगदिनाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
सन 2026-27 या वर्षातील 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY 2026) अधिकृत संकल्पना निरोगी
वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing) अशी निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेच्या
माध्यमातून योगासने हा नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा आणि सर्वांना
आरोग्यदायी जीवन जगता यावे, हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री महोदयांनी सन 2019 मध्ये सुरू केलेल्या 'फिट इंडिया मुव्हमेंट'चा मुख्य उद्देश प्रत्येक
नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीचा (Fitness) स्वीकार करणे हा आहे. ही संकल्पना आता
एक देशव्यापी लोकचळवळ बनली असून, योग व इतर शारीरिक तंदुरुस्तीच्या उपक्रमांद्वारे नागरिकांना
नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित केले जात आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शारीरिक व मानसिक
आरोग्य तसेच सामाजिक सहभागासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून समोर आली आहे.
जिल्ह्यातील हा योगदिन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा
व महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात शाळांमधील स्काऊट्स अँड
गाईड्स, एन.सी.सी. (NCC) आणि एन.एस.एस. (NSS) च्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी व जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, या उपक्रमांतर्गत सर्वाधिक लोकसहभाग असणारा कार्यक्रम आयोजित करून तो यशस्वी करावा. तसेच, जिल्ह्यातील सर्व सहभागी व संबंधित संस्था, शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर आयोजित
केलेल्या कार्यक्रमांची माहिती http://bit.ly/4ex4c6S या लिंकवर जाऊन अद्ययावत (Update) करावी,
असेही जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर