छ. संभाजीनगरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, घराच्या मालकिणीचा होरपळून जागीच अंत
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)। शहरातील पुंडलिकनगर आणि गजानन नगर परिसराला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी दुर्घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर गल्ली नंबर एकच्या शेवटी व गजानन नगरच्या सुरुवातीला असलेल्या एका तीन मजली रहिवासी घरामध्ये
छ. संभाजीनगरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, घराच्या मालकिणीचा होरपळून जागीच अंत


छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।

शहरातील पुंडलिकनगर आणि गजानन नगर परिसराला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी दुर्घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर गल्ली नंबर एकच्या शेवटी व गजानन नगरच्या सुरुवातीला असलेल्या एका तीन मजली रहिवासी घरामध्ये आज शनिवारी ( दि. २०) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात घराच्या मालकिण सुनंदा मोरे या महिलेचा घरामध्येच होरपळून जागीच अंत झाला आहे. तर, आईला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या साखळी स्फोटाने संपूर्ण पुंडलिकनगर परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माहितीनुसार, आज शनिवारच्या सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या घरात वॉटर प्युरिफिकेशन उपकरणाला अचानक भीषण शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटच्या ठिणग्या उडून काही सेकंदांतच घरातील इतर साहित्याने पेट घेतला आणि ही आग वेगाने पसरत स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. पसरलेल्या आगीच्या अतिउष्णतेमुळे स्वयंपाकघरात असलेल्या फ्रीजचा पहिला मोठा स्फोट झाला. फ्रीज फुटल्यामुळे आगीचा भडका थेट गॅस सिलिंडरपर्यंत गेला आणि अवघ्या काही सेकंदांतच गॅस सिलिंडरचा प्रचंड कानठळ्या बसवणारा दुसरा मोठा स्फोट झाला. या आगीच्या आणि स्फोटाच्या विळख्यात सापडल्याने सुनंदा मोरे यांना घराबाहेर पडता आले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण अग्निकांडात मृत सुनंदा मोरे यांचा मुलगा वैभव मोरे हा देखील आगीच्या ज्वालांमध्ये अडकला होता. आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात वैभवचे दोन्ही हात आणि शरीर गंभीररीत्या भाजले आहे. त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande