कर्जतमध्ये नवीन पुलाच्या कामाची आमदार थोरवेंकडून पाहणी
रायगड, 20 जून (हिं.स.) : कर्जत शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नवीन श्रीराम पुलाच्या कामाची आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी पुलाच्या उर्वरित कामांचा सविस्तर आढावा घेत सार्वजनिक
A significant milestone in Karjat's development; inspection of the new Shriram Bridge.


रायगड, 20 जून (हिं.स.) : कर्जत शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नवीन श्रीराम पुलाच्या कामाची आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी पुलाच्या उर्वरित कामांचा सविस्तर आढावा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिल्लक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

कर्जत शहरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नवीन श्रीराम पूल हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग ठरणार आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका आमदार थोरवे यांनी व्यक्त केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना आणि वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा यांचीही सखोल पाहणी केली.

नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही आमदार थोरवे यांनी सांगितले. कर्जतच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर सातत्याने लक्ष ठेवून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक संकेत भासे, वैभव सुरवसेकर, रोहित ओसवाल, किशोर कदम, कोमल कन्हेरेकर, जागृती देवधर, अर्चना वायकर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन श्रीराम पूल पूर्ण झाल्यानंतर कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande