
अमरावती, 20 जून (हिं.स.)।
अमरावती ग्रामीण हद्यीतील बरेच वाहन चालकांनी त्यांचे दुचाकी वाहनांना विशेषतः बुलेट गाडयांमधे नियमबाहय पध्दतीने मॉडिफाईड सायलेन्सर बसवून किंवा सायलेन्सरमधे कट आउटचा वापर करून सायलेन्सरचा आवाज थेट बाहेर काढून फटाक्यांसारखा आवाज येईल अशी रचना केली होती. अशा १५० दुचाकी चालकांवर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे.
कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर दुचाकी गाडयांमधे वापरल्याने नागरीकांना विशेषतः जेष्ठ नागरीक, लहांना मुलांना, आजारी व्यक्ति व सर्वसामान्य नागरीकांना नाहक मनस्ताप होत होता. प्रमाणात ध्वनी प्रदूषण देखील होत होते. याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्हा वाहतूक शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. जिल्हयातील सर्व ३१ पोलिस स्टेशन प्रभारी अधिकार्यांना विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली. मॉडीफाईड सायलेन्सरचा वापर करणारे एकूण १५० दुचाकी चालकांवर कार्यवाही करून त्यांचेकडून १ लाख ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. सायलेन्सर जमा करण्यात आले. ही कारवाई अशीच अखंड सुरू राहणार आहे. असे वाहन आढळल्यास ११२ वर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा वाहतूक शाखा, अमरावती ग्रामीणतर्फे सामान्य नागरीकांना करण्यात आले आहे.
---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी